२६ दिवसांच्या उपोषणामागे डील? सोनम वांगचुक यांनी केला मोठा खुलासा
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी तब्बल २६ दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या आरोपांना अखेर सडेतोड उत्तर दिले आहे. उपोषण सोडण्यासाठी केंद्र सरकारशी कोणताही गुप्त सौदा किंवा राजकीय डील झालेली नसल्याचा ठाम दावा त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांचे हित, त्यांच्यावरील संभाव्य कारवाई रोखणे आणि देशातील तणावपूर्ण परिस्थितीत हिंसाचार टाळणे, यासाठीच आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्हिडिओ संदेशातून बोलताना वांगचुक यांनी सांगितले की, सलग २६ दिवसांच्या उपोषणामुळे त्यांचे तब्बल ११ किलो वजन कमी झाले. शरीरातील स्नायू कमकुवत झाले असून अवयव आणि मेंदूवरही गंभीर परिणाम होण्याच्या उंबरठ्यावर ते पोहोचले होते. अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष आपण सुरूच ठेवला, असे त्यांनी सांगितले.
26 व्या दिवशी उपाेषण मागे घेतल्यानंतर साेनम वांगचुक यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यांनी काहीतरी डील केली आहे का, असा संशयही व्यक्त करण्यात आला. त्यामुळे वांगचुक व्यथित झाले आहेत. असे आराेप करणारे काेणताही विचार न करता, घरात बसून आराेप करतात. पण त्यामुळे माझ्यासारख्याच्या मनाला खूप वेदना हाेतात. मी हे सगळे का करताेय, कशासाठी करताेय, असेही कधीकधी वाटते, असेही वांगचुक यांनी म्हटले आहे. त्यांनी आपले सर्वाेच्च प्राधान्य हे आंदाेलनातील विद्यार्थ्यांवर काेणतीही कारवाई करण्यात येऊ नये, याला हाेते. आणि सरकारने ते मान्य केले, तसे लेखीही दिले. त्यामुळे मी उपाेषण संपविले, असेही वांगचुक यांनी म्हटले.
२६ दिवसांच्या उपोषणामागे डील?
उपोषण मागे घेण्यासाठी केंद्र सरकारशी गुप्त करार झाल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना वांगचुक म्हणाले, जर मला सौदा करायचाच असता, तर दिल्लीच्या रस्त्यावर २६ दिवस उपाशी बसण्याची गरज नव्हती. वातानुकूलित खोलीत बसूनही ते शक्य झाले असते. त्यामुळे अशा आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
त्यांनी टीका करणाऱ्यांना परिस्थितीची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरच मत व्यक्त करण्याचे आवाहन केले.
सफदरजंग रुग्णालय नव्हे, तर तुरुंग होता
प्रकृती खालावल्याने १८ तारखेला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर स्वतःवर कठोर निर्बंध लादण्यात आल्याचा गंभीर आरोपही वांगचुक यांनी केला. मोबाईल, लॅपटॉप वापरण्यास बंदी होती. केवळ तीन नातेवाईकांनाच भेटण्याची परवानगी होती. लडाखहून आलेल्या सहकाऱ्यांनाही भेटण्यास मज्जाव करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दिल्ली उच्च न्यायालयाने स्वतंत्र नागरिक असल्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही रुग्णालयातून बाहेर पडू दिले गेले नाही. आदेशाची अंमलबजावणी करण्यात मुद्दाम विलंब करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
मेदांता रुग्णालयातही कडक सुरक्षा
सफदरजंगनंतर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भेटीगाठींवर निर्बंध कायम होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे वांगचुक यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांसमोर ठेवल्या चार महत्त्वाच्या अटी
वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी सरकारसमोर चार प्रमुख अटी ठेवल्या.
शिक्षण व्यवस्थेतील जबाबदारी निश्चित करणे.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणे.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देणे.
आंदोलनात सहभागी झालेल्या CJP आणि इतर विद्यार्थी नेत्यांवर कोणतीही एफआयआर किंवा कायदेशीर कारवाई न करण्याची लेखी हमी देणे.
यापैकी विद्यार्थ्यांवरील कारवाई रोखणे हीच सर्वात महत्त्वाची अट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लेखी हमी मिळाल्यानंतरच उपोषण मागे
सरकारने सुरुवातीला काही मागण्यांवर तोंडी सहमती दर्शवली होती. मात्र विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही, याची लेखी हमी मिळाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे वांगचुक यांनी सांगितले. अखेर लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच त्यांनी उपोषण सोडल्याचा दावा केला.
हिंसाचार टाळण्यासाठी घेतला निर्णय
त्या काळात दिल्लीतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. कोणत्याही क्षणी हिंसाचार भडकण्याची शक्यता होती. विद्यार्थ्यांचे रक्षण आणि देशातील परिस्थिती आणखी चिघळू नये, या उद्देशाने उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचे भविष्य माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापेक्षा आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ नयेत, त्यांना न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागू नये, यालाच आपण अधिक प्राधान्य दिल्याचे वांगचुक यांनी सांगितले.
READ THIS ; विहीर अनुदान योजना 2026 : नवीन सिंचन विहिरीसाठी 5 लाखांपर्यंत अनुदान; पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया
टीकाकारांना भावनिक आवाहन
व्हिडिओच्या शेवटी त्यांनी भावनिक शब्दांत आवाहन केले. घरापासून दूर राहून, उपाशीपोटी आणि अत्यंत कठीण परिस्थितीत आम्ही हा संघर्ष केला आहे. अशा वेळी निराधार आरोप मनाला वेदना देतात. कृपया परिस्थिती समजून घ्या, संवेदनशीलता ठेवा आणि जबाबदारीने मत व्यक्त करा.









