सुटे तेल विक्रीवर कडक निर्बंध ; खाद्य तेलाच्या भेसळीवर सरकारचा मोठा प्रहार
मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत खाद्य तेल उद्योगासाठी कडक अनुपालन आदेश जारी करण्यात आला आहे. सुटे खाद्य तेल, भेसळयुक्त तेल, अघोषित तेलांचे मिश्रण, मुदत संपलेल्या तेलाचे पुनर्पॅकिंग आणि अन्नासाठी अयोग्य डब्यांचा वापर यावर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. उत्पादनापासून पॅकिंग, वाहतूक, घाऊक-किरकोळ विक्री तसेच ऑनलाइन विक्रीपर्यंत संपूर्ण खाद्य तेल साखळी या आदेशाच्या कक्षेत आणण्यात आली आहे.
अन्नसुरक्षा विभागाच्या तपासणीत खाद्य तेल क्षेत्रात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. विनापरवाना किंवा विनानोंदणी व्यवसाय, घोषित तेलात अघोषित तेलांचे मिश्रण, निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त ट्रान्सफॅट, आम्लमूल्याची मर्यादा ओलांडणे, मोहरी तेलाचे अनधिकृत मिश्रण, तेलाचा मूळ स्रोत किंवा उत्पादन दिनांक लपवणे आणि मुदत संपत आलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग करणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत.
सुटे तेल विक्रीवर कडक निर्बंध
नव्या अनुपालन आदेशातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुटे आणि लेबलविरहित खाद्य तेल विक्रीवर निर्बंध. खाद्य तेल केवळ सीलबंद, छेडछाड झाल्याचे स्पष्टपणे लक्षात येईल अशा आणि पूर्ण माहिती असलेल्या लेबलयुक्त पॅकेजिंगमधून विकणे अपेक्षित आहे.
सुट्या तेलाला बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, वैधता कालावधी आणि उत्पादकाची माहिती नसल्याने त्याचा स्रोत शोधणे कठीण होते. त्यामुळे अन्नविषबाधा किंवा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवल्यास जबाबदार व्यक्ती किंवा संस्था शोधण्यात अडचणी येऊ शकतात.
सुटे तेल रवाना करणारा उत्पादक किंवा वितरक हा प्राथमिक उल्लंघनकर्ता मानला जाऊ शकतो. किरकोळ विक्रेत्यांनी सील नसलेली किंवा छेडछाड झालेली तेलाची खेप स्वीकारू नये, तसेच अशा पुरवठ्याची माहिती अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित आहे.
भेसळयुक्त आणि अघोषित तेलांवर कारवाई
खाद्य तेलात अघोषित तेलांचे मिश्रण किंवा भेसळ करणे गंभीर उल्लंघन मानले जाणार आहे. तपासणीमध्ये काही ठिकाणी घोषित तेलात इतर तेलांचे मिश्रण केल्याचे आढळले आहे. विशेषतः मोहरीच्या तेलाच्या बाबतीत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
८ जून २०२१ नंतर उत्पादित बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलात मोहरीचे तेल मिसळता येणार नाही. मोहरीचे तेल स्वतंत्र आणि शुद्ध स्वरूपात विकणे अपेक्षित आहे. बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलाची विक्री करताना पॅकेजिंगवर घटक तेलांची नावे आणि त्यांचे प्रमाण स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
गंजलेल्या डब्यातील तेल घेणे टाळा
खाद्य तेलासाठी वापरले जाणारे पॅकेजिंग साहित्य फूड ग्रेड असणे आवश्यक आहे. गंजलेले, डाग पडलेले, वेल्डिंग केलेले किंवा यापूर्वी खनिज तेल, रसायने अथवा अखाद्य पदार्थ साठवण्यासाठी वापरलेले डबे खाद्य तेलासाठी वापरण्यास मनाई आहे.
अशा डब्यांमधून धातूजन्य किंवा अन्य दूषित घटक तेलात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी जुने, गंजलेले किंवा संशयास्पद पॅकेजिंग असलेले खाद्य तेल खरेदी करू नये.
घातक पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकरमधून तेलाची वाहतूक नाही
खाद्य तेलाच्या वाहतुकीबाबतही कडक निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी खनिज तेल, घातक पदार्थ किंवा अखाद्य माल वाहून नेण्यासाठी वापरलेले टँकर खाद्य तेलाच्या वाहतुकीसाठी वापरता येणार नाहीत.
खाद्य तेल थेट सूर्यप्रकाश, उष्णता, दुर्गंधीयुक्त पदार्थ आणि घातक पदार्थांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. साठवणुकीसाठी FIFO अर्थात First In, First Out पद्धतीचा वापर करण्याचेही निर्देश आहेत.
तळणीचे तेल वारंवार वापरणे टाळा
हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून तळणीचे तेल वारंवार गरम करून वापरण्याच्या प्रकारावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तेल वारंवार तापवल्याने त्यामध्ये हानिकारक ध्रुवीय संयुगे, ट्रान्स फॅटी अॅसिड आणि अल्डिहाइड्स तयार होण्याचा धोका असतो.
त्यामुळे तळणीसाठी वापरलेले तेल निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त खराब झाल्यास त्याचा पुनर्वापर करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
वर्षभरात १,२४७ नमुन्यांची तपासणी
२०२५-२६ या आर्थिक वर्षात अन्नसुरक्षा विभागाने खाद्य तेलाचे १,२४७ नमुने तपासले. त्यापैकी १,१४२ नमुने मानकांनुसार आढळले, तर ७७ नमुने सब-स्टँडर्ड असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान खाद्य तेलाचा मोठ्या प्रमाणातील साठा जप्त करण्यात आला असून, जप्त मालाची किंमत सुमारे ५ कोटी ३१ लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उत्पादकापासून ऑनलाइन विक्रेत्यापर्यंत सर्वांना नियम लागू
नवा आदेश खाद्य तेल उद्योगातील संपूर्ण साखळीला लागू आहे. तेल एक्स्पेलर युनिट, सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन युनिट, तेल शुद्धीकरण करणारे उद्योग, वनस्पती व मेद उत्पादक, बहुस्रोत खाद्य वनस्पती तेलाचे ब्लेंडर्स, पुनर्पॅकिंग व पुनर्लेबलिंग उद्योग, आयातदार, घाऊक विक्रेते, वितरक, सुपर स्टॉकिस्ट, वाहतूकदार, किराणा दुकाने, सुपर मार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर तसेच ई-कॉमर्स आणि ऑनलाइन विक्रेते यांचा त्यात समावेश आहे.
महाराष्ट्रात खाद्य तेलाचे २१२ सेंट्रल लायसन्स आणि २८५ स्टेट लायसन्सधारक, असे एकूण ४९७ उत्पादक नोंदणीकृत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नियम मोडल्यास दंड आणि कारवाई
असुरक्षित अन्न आढळल्यास अन्नसुरक्षा व मानके कायद्यातील कलम ५९ अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे. अवमानक खाद्य तेलासाठी पाच लाख रुपयांपर्यंत, मिसब्रँडेड उत्पादनासाठी तीन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. विनापरवाना व्यवसाय आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही दंडाची तरतूद आहे.
गरजेनुसार संबंधित आस्थापनाचा परवाना निलंबित करणे, सुधारणा नोटीस देणे किंवा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते.
ग्राहकांनी खाद्य तेल खरेदी करताना काय पाहावे?
ग्राहकांनी सुटे खाद्य तेल खरेदी करू नये. पॅकबंद तेल घेताना लेबल, बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, बेस्ट बिफोर किंवा एक्सपायरी डेट, पॅकेजिंग आणि सील तपासावे. बहुस्रोत खाद्य तेल असल्यास घटक तेलांची नावे व त्यांचे प्रमाण स्पष्टपणे दिले आहे का, हेही पाहावे.
खाद्य तेलाच्या विक्रीत भेसळ किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करता येते. अन्नसुरक्षेशी संबंधित तक्रारींसाठी 1800-222-365 हा टोल-फ्री क्रमांक आणि ‘Food Safety Connect’ प्रणाली उपलब्ध आहे.
खाद्य तेल हा रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असल्याने त्याच्या गुणवत्तेशी तडजोड करणे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे उत्पादनापासून ग्राहकाच्या स्वयंपाकघरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्यावर सरकारने भर दिला आहे.
READ MUST ; सोलापूर-पुणे हायवेवर मोठी कारवाई; ६० मीटरमधील ढाबे-हॉटेल्स हटणार
#खाद्यतेल #तेलभेसळ #FoodSafety #Maharashtra #FoodAdulteration #खाद्यसुरक्षा #महाराष्ट्रबातम्या #सुटेतेल #HealthNews #FoodSafetyMaharashtra








