Tuesday, July 28, 2026
Home ताज्या बातम्या पंढरपुरात 61 अनधिकृत रिक्षांवर कारवाई; 4.10 लाखांचा दंड

पंढरपुरात 61 अनधिकृत रिक्षांवर कारवाई; 4.10 लाखांचा दंड

0
8
पंढरपुरात अनधिकृत रिक्षांवर संयुक्त कारवाई
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात पोलीस व परिवहन विभागाने अनधिकृत आणि नियमबाह्य रिक्षांवर संयुक्त कारवाई करत 61 रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली.

आषाढी वारी 2026 : पंढरपुरात अनधिकृत रिक्षांवर धडक कारवाई; 61 रिक्षांना दंड, 11 रिक्षा जप्त

पंढरपूर | प्रतिनिधी

पंढरपुरात अनधिकृत रिक्षांवर कारवाई करत पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबवली.आषाढी वारी 2026 च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात भाविकांच्या सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी पोलीस व परिवहन विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबवत अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत एकूण 115 रिक्षांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 61 रिक्षांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून 11 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत एकूण 4 लाख 10 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पंढरीत येणाèया भाविकांची लूट करणाèयांवर आता पाेलीस प्रशासनाची करडी नजर राहणार असून आषाढी यात्रा काळात रिक्षा, हाॅटेल, लाॅज अशा ठिकाणी जर काेणी भाविकांची लूट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठाेर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. भाविक माेठ्या श्रध्देने आणि भक्तीभावाने पंढरीत येत असतात, पण येथे आल्यावर वारकरी म्हणजे केवळ कमाईचे साधन आहे, असा समज करून काहीजण त्यांची लूट करतात.

यंदा आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने 15 ते 29 जुलै या कालावधीत यात्रा भरत असून, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून सुमारे 18 ते 20 लाख भाविक पंढरपुरात दाखल होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि प्रवाशांची आर्थिक फसवणूक रोखणे या उद्देशाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये धावणाऱ्या ऑटो रिक्षांची संयुक्त तपासणी करताना वैध चालक परवाना नसणे, आवश्यक परमिटशिवाय प्रवासी वाहतूक करणे, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र व विमा नसणे, तसेच प्रवाशांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारणे अशा विविध नियमभंगाच्या प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

पंढरपुरात अनधिकृत रिक्षांवर कारवाई; 115 रिक्षांची तपासणी

मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले की, यात्रेदरम्यान लाखो वारकरी आणि भाविक शहरात येत असल्याने त्यांची वाहतूक सुरक्षित, सुलभ आणि नियमानुसार होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. आगामी काळातही ही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

परिवहन विभागाने रिक्षाचालकांना महत्त्वाचे आवाहनही केले आहे. प्रत्येक चालकाने वैध वाहन परवाना, परमिट, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र आणि विमा कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक आहे. तसेच शासनाने निश्चित केलेले भाडेपत्रक प्रवाशांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक असून त्याचे पालन न करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.

वर्दळ असलेल्या भागात नियमित तपासणी

यात्रेच्या काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे काही चालक जादा भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे किंवा परवान्याविना वाहतूक करणे असे प्रकार घडतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे विशेष पथके नेमली असून शहरातील प्रमुख रस्ते, बसस्थानक परिसर, विठ्ठल मंदिर परिसर तसेच भाविकांची मोठी वर्दळ असलेल्या भागात नियमित तपासणी सुरू आहे.

या संयुक्त कारवाईमुळे नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षाचालकांना दिलासा मिळाला असून भाविकांनाही सुरक्षित आणि पारदर्शक वाहतूक सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. प्रशासनाने वारकरी आणि भाविकांना जादा भाडे आकारल्यास किंवा नियमबाह्य वाहतूक आढळल्यास तत्काळ पोलीस किंवा परिवहन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये परिवहन अधिकारी स्वप्निल गिरी, मोटार वाहन निरीक्षक राजन सरदेसाई, संतोष झगडे, श्रेयस सरागे, नितीन गायकवाड, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विक्रांत होनमोरे, प्रतीक्षा नारायणकर, भाग्यश्री रोडगे, कोमल डांगे, हनुमंत गेळे, सागर नलावडे तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, आषाढी वारीच्या काळात पंढरपूर शहरात वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पोलीस आणि परिवहन विभागाने विविध चौक, बसस्थानक, रेल्वे स्थानक, विठ्ठल मंदिर परिसर तसेच प्रमुख प्रवेशद्वारांवर विशेष तपासणी नाके उभारले आहेत. भाविकांची फसवणूक होऊ नये, जादा भाडे आकारले जाऊ नये आणि कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर प्रवासी वाहतूक होऊ नये, यासाठी दिवसरात्र पथके कार्यरत आहेत. प्रशासनाकडून रिक्षाचालकांना शासनाने निश्चित केलेल्या भाडेदराचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांशी सौजन्याने वागावे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊ नयेत आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर गरज पडल्यास वाहन जप्त करण्याची कारवाईही सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे यात्रेदरम्यान सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वाहतूक व्यवस्था राखण्यावर प्रशासनाचा विशेष भर आहे.

read this news ; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलिसांची धडक मोहीम; 53 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here