बार्शी : विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर बार्शीच्या विकासाला अधिक वेग देण्याचा निर्धार आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून बार्शीसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामांना गती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Rajendra Raut बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे सभापती विजय गरड, उपसभापती बाबा गायकवाड, मीनाक्षीताई रोंगे, संतोष (दादा) निंबाळकर, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, उद्योजक प्रशांत कथले तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार राऊत म्हणाले की, बार्शी शहरासाठी आगामी महिनाभरात सुमारे पावणेदोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर १,२०० कोटी रुपयांच्या रस्ता विकास प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, त्यामध्ये २५० कोटी रुपये भूसंपादनासाठी आणि ९५० कोटी रुपये रस्ते विकासासाठी उपलब्ध होणार आहेत. बार्शीच्या पाणीटंचाईबाबत बोलताना त्यांनी नागरिकांची माफी मागत, शहराचा पुढील ३० वर्षांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या योजनेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.शेतकऱ्यांच्या पिकविमा प्रश्नावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून संबंधित पिकविमा कंपनीवर आवश्यक कारवाई करून पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला विश्वास आपण विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू, असे सांगत राऊत यांनी बार्शीतील मतदारांसह संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले. “पूर्वीपेक्षा दुप्पट ताकदीने जनतेची सेवा करणार असून, लवकरच पदाधिकाऱ्यांसह तालुकाभर गावभेट दौरा काढून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
#राजाभाऊराऊत#बार्शीविकास#बार्शीन्यूज#विकासकामे#सोलापूर
#RajabhauRaut#Barshi#BarshiDevelopmentSolapurNews#MaharashtraPolitics









