Tuesday, July 28, 2026
Home ताज्या बातम्या ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावरील ‘प्रहार’ चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित; राजकुमार राव...

ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावरील ‘प्रहार’ चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित; राजकुमार राव साकारणार मुख्य भूमिका

0
9
Adv Ujjwal Nikam Prahar Movie

सोलापूर | प्रतिनिधी

देशातील ज्येष्ठ विधिज्ञ, विशेष सरकारी वकील आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ हा हिंदी चित्रपट येत्या ९ ऑगस्ट रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण न्यायालयीन लढे, देशहितासाठी त्यांनी केलेले कार्य आणि विशेषतः २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील त्यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

राजकुमार राव साकारणार ॲड. निकम यांची भूमिका

सोमवारी सायंकाळी ॲड. उज्ज्वल निकम यांनी सोलापूरातील अक्कलकोट रोड परिसरातील हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथे सदिच्छा भेट दिली. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्यांनी सोसायटीच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली.

या मुलाखतीदरम्यान बोलताना ॲड. निकम यांनी मोठी घोषणा केली. त्यांच्या जीवनावरील दोन तासांच्या ‘प्रहार’ या हिंदी चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध अभिनेते राजकुमार राव हे साकारणार आहेत.

२६/११ खटला आणि कसाबला फाशीचा थरार रुपेरी पडद्यावर

चित्रपटात त्यांच्या वकिलीच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या घटनांसह २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया, मुख्य आरोपी अजमल कसाबविरुद्ध उभारलेला खटला आणि न्यायालयीन निर्णयापर्यंतचा संपूर्ण प्रवास अतिशय वास्तववादी पद्धतीने साकारण्यात आल्याचे ॲड. निकम यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित नागरिकांना या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलरही दाखविण्यात आला.

“चित्रपटाची निर्मिती करताना सत्य घटनांवर आधारित माहिती, न्यायालयीन प्रक्रिया आणि तपशीलवार संशोधनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आणि तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, या मुख्य उद्देशाने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.” – ॲड. उज्ज्वल निकम

सर्व नागरिकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सोलापुरात ॲड. निकम यांचा भव्य सत्कार

कार्यक्रमाच्या प्रारंभी वर्षाताई चौगुले आणि सोसायटीच्या अध्यक्षा अंजली माशाळकर यांनी औक्षण करून ॲड. निकम यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. त्यानंतर नागेश चौगुले यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी अंजली माशाळकर यांनी सोसायटीच्या विविध उपक्रमांचा व प्रगतीचा संक्षिप्त आढावा सादर केला. यावर समाधान व्यक्त करत ॲड. निकम यांनी सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या विशेष कार्यक्रमास डॉ. सूर्यप्रकाश कोठे, सिद्धेश्वर श्रीगादी, काशिनाथ बिराजदार, सुरेश येळमेळी, शंकर गाडी, गुरुशांत ढंगे, दशरथ वडतिले, शिव कोरे, शिवया मसुती, डॉ. खानापुरे, चन्नप्पा बिराजदार, गोविंदे आणि क्षीरसागर यांच्यासह सोसायटीतील अनेक सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here