
ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरण तापले
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे घडलेल्या ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. पट्टी वडगाव येथील 21 वर्षीय ज्ञानेश्वर वाकडे याची शनिवारी मध्यरात्री चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत संशय व्यक्त होत असून, घाटनांदूर येथील एका सरपंचाचे नावही चर्चेत आले आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाकडे कुटुंबीयांची भेट घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून, “या प्रकरणामागचा खरा बॉस समोर आला पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
घाटनांदूर येथे ज्ञानेश्वर वाकडेची निर्घृण हत्या
शनिवारी रात्री घाटनांदूर परिसरात किरकोळ वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या वादाचे रूपांतर काही क्षणांत रक्तरंजित हल्ल्यात झाले. ज्ञानेश्वर वाकडे याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून दुसरा मित्र प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून निघून गेल्याने त्याचा जीव वाचल्याचे सांगितले जाते.
घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यासह संशयित सरपंचाविरोधातही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर तब्बल 12 तास ठिय्या आंदोलन केले. आंदोलनानंतर पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आणि त्यापैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली.
या प्रकरणात घाटनांदूर येथील संशयित सरपंच महेश गारठे यांच्या मालकीच्या मंगल कार्यालयात आरोपी लपल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरोपींना पळून जाण्यास मदत करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करत सरपंचालाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, संबंधित सरपंचांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून न्यायालयाने पीडित कुटुंबीयांची बाजू ऐकून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्ञानेश्वरच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, असे त्यांनी सांगितले. सुरुवातीला पोलिसांनी अपघात झाल्याचे सांगितले; मात्र प्रत्यक्षदर्शींनी हा हल्ला असल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि त्यांना मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीवरही सोनवणे यांचा निशाणा
दरम्यान, या प्रकरणाला राजकीय रंगही चढू लागला आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाकडे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “या प्रकरणामागे कोणाचा हात आहे, कोण आरोपींना संरक्षण देत आहे आणि या संपूर्ण कटाचा सूत्रधार कोण आहे, हे समोर आले पाहिजे. केवळ प्रत्यक्ष आरोपींनाच नव्हे तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या व्यक्तींवरही कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.
सोनवणे यांनी पुढे सांगितले की, बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. वाकडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
यापूर्वी जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले होते. त्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरण समोर आल्याने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हिंसक घटना, वाढती गुंडगिरी, वर्चस्ववाद, हप्ता वसुली आणि स्थानिक पातळीवरील वैमनस्य यामुळे बीडमधील गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना मदत करणाऱ्या किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचाही सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या हत्येचा तपास पुढे जात असताना आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








