Tuesday, August 4, 2026
Home ताज्या बातम्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांच्याही तोंडी ‘राजकारणातून निवृत्ती’चा उल्लेख; बीडच्या राजकारणात...

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांच्याही तोंडी ‘राजकारणातून निवृत्ती’चा उल्लेख; बीडच्या राजकारणात चर्चांना उधाण

0
22
धनंजय मुंडे म्हणाले, "राजकारणात राहावं की न राहावं, असा विचार मनात येतो" पंकजा मुंडे म्हणाल्या, "आता कंटाळा आलाय... राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं"

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे नेते मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये राजकारणातून निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. जरी दोघांनीही वेगवेगळ्या संदर्भात ही भूमिका मांडली असली, तरी त्यांच्या विधानांकडे राजकीय निरीक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, “राजकारणात राहावं की न राहावं, असा विचार मनात येतो”

माजलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य केले.

ते म्हणाले की, सध्या जाती-पातीच्या राजकारणाने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. अशा वातावरणामुळे “राजकारणात राहावं की न राहावं” असा विचार मनात येतो. मात्र, महापुरुषांचे विचार आणि सामाजिक समतेची प्रेरणा आपल्याला पुढे काम करण्याची ताकद देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढेही कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आता कंटाळा आलाय… राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं”

दुसरीकडे, बीड-परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना आणि परळी येथे आयोजित कवी संमेलनाच्या समारोपात मंत्री पंकजा मुंडे यांनीही राजकीय निवृत्तीचा उल्लेख केला.

रस्त्याच्या खराब अवस्थेबद्दल बोलताना त्यांनी, “या रस्त्यावरून येताना पीएला म्हटलं, आता कंटाळा आलाय… राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं,” असे सांगितले.

तथापि, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहून नव्याने ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. “ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, तर तुमच्या विकासासाठी आहे,” असे सांगत त्यांनी विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

“राजकारणातही एक्झिट असतो”

कवी संमेलनात राजकारणावर आधारित व्यंगात्मक कविता ऐकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आणखी एक महत्त्वाचे विधान केले.

त्या म्हणाल्या, “जर राजकारण माझ्या विचारांशी सुसंगत राहिले नाही, तर समृद्धी महामार्गावर जसा एक्झिट असतो, तसाच माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. जो एक्झिटसाठी तयार असतो, तोच निर्भयपणे राजकारण करू शकतो.”

बीडच्या राजकारणात चर्चांना वेग

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी केलेली ही वक्तव्ये वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या संदर्भात आली असली, तरी दोन्ही नेत्यांनी राजकारणातील वैयक्तिक भूमिकेबाबत केलेल्या उल्लेखामुळे बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. या विधानांचा भविष्यातील राजकीय घडामोडींवर काही परिणाम होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here