
तुकाराम मुंढेंचा पहाटेच धडक स्ट्राईक! परांड्यात एकाच रात्रीत तब्बल १ कोटींचा बेकायदा गुटखा जप्त Tukaram Mundhe paranda DHARASHIV
धाराशिव / परांडा: Dharashiv Paranda
संपूर्ण शहर गाढ झोपेत असताना ५ जून रोजी पहाटेच्या सुमारास धाराशिव जिल्ह्यातील बेकायदा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणून सोडणारी एक मोठी आणि अत्यंत गोपनीय कारवाई पार पडली. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार नुकताच स्वीकारलेले कर्तव्यदक्ष आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट आदेशानुसार, परांडा शहरात प्रतिबंधित गुटख्याच्या अड्ड्यांवर एकाच वेळी धडक छापे टाकण्यात आले. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी १ लाख ८८ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बेकायदा गुटखा जप्त करण्यात आला असून, यामुळे तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (FDA)
स्थानिक यंत्रणांना अंधारात ठेवून ‘गुप्त’ मोहीम
आयुक्त तुकाराम मुंढे आणि सह-आयुक्त श्रीकांत करकाळे यांना परांडा शहरात प्रतिबंधित गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. या मोहिमेची गुप्तता राखण्यासाठी स्थानिक यंत्रणांना शेवटच्या क्षणापर्यंत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले.
कारवाईसाठी केवळ स्थानिक प्रशासनावर अवलंबून न राहता पुणे, सांगली, सोलापूर आणि धाराशिव येथील अधिकाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली. या सर्व पथकांनी पूर्वनियोजनानुसार शुक्रवारी पहाटे बरोबर ५ वाजता शहराच्या चार वेगवेगळ्या भागांत एकाच वेळी छापे टाकले.

गोदामांवर छापे; जप्त मालाचा तपशील RAID
या मोहिमेत प्रामुख्याने दोन मोठ्या ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली:
-
बावची चौक परिसर: येथील तीन गोदामांची सखोल तपासणी केली असता, तब्बल १,०१,८८,५०८ रुपये किमतीचा अवैध गुटखा आढळून आला.
-
बस स्थानक मार्ग: येथील एका बेकरीजवळ टाकलेल्या छाप्यात एकूण ७८,७५५ रुपयांचा प्रतिबंधित माल सापडला.
टेंपोला माराव्या लागल्या फेऱ्या:
जप्त केलेल्या मालाचे प्रमाण इतके प्रचंड होते की, तो सर्व माल परांडा पोलीस ठाण्यात सुरक्षित हलवण्यासाठी एका मोठ्या क्षमतेच्या टेम्पोला तब्बल दोन चकरा माराव्या लागल्या.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रमोदकुमार काकडे, संतोष सावंत, डॉ. सुमित खांडेकर, वीर स्वामी, उमेश भुसे, धनंजय आगाव, रोहित फंदी, गणेश दत्तू, अभिजित झोडगे आणि ऋषिकेश मते यांच्यासह स्थानिक पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्याने यशस्वी केली.
तस्करांचे धाबे दणाणले; बाजारपेठेत शुकशुकाट
या गोपनीय कारवाईची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच सर्व छोट्या-मोठ्या पानटपऱ्या आणि दुकाने दिवसभरासाठी पूर्णपणे बंद राहिली. कारवाईच्या भीतीने अनेक विक्रेत्यांनी शहरातून पळ काढला. सध्या हा करोडोंचा माल नेमका कोणाचा आहे, गोदामांचे मालक कोण आहेत आणि त्यांनी ती जागा कोणाला भाड्याने दिली होती, या सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस करत आहेत.








