अकलूजकरांची अदृष्य शक्ती आणि राजाभाऊंचा मास्टरस्ट्रोक![]()
नेमके घडले काय?
विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल थोड्यावेळापूर्वीच जाहीर झाला आणि महायुतीचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांनी या निवडणुकीत दणदणीत आणि धडाकेबाज विजय मिळवत आपले नेतृत्व सिध्द केले. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या निवडणुकीत खूप मोठी चुरस आहे आणि आपल्याला अदृष्य शक्ती मदत करत आहे, असे दावे सुरूवातीपासूनच केले होते. परंतु हे सगळे दावे राजाभाऊ राऊत यांनी फोल ठरविले. या निवडणुकीच्या निकालानंतर आता संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची समिकरणे झपाट्याने बदलणार असल्याचेही दिसू लागले आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीचे सुरूवातीपासून प्रयत्न होते. तशा हालचालीही दिसत होत्या. पण नाहक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न केला. ना त्यांच्याजवळ निवडणुकीत हवे असणारे किमान संख्याबळ होते, ना महायुतीला टक्कर देण्याची ताकद होती. पण तरीही लोकशाही आहे, प्रत्येकालाच निवडणूकीत आपले नशिब आजमावण्याचा अधिकार आहे. पण किमान आपल्याकडे पुरेसे संख्याबळ नाही, आणि महायुतीचे स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठे प्राबल्य आहे, हे लक्षात घेऊन धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पावले टाकायला हवी होती. पण त्यांनी तसे केले नाही आणि त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली. वसंतराव देशमुख यांचा जसा हा पराभव आहे, त्यापेक्षाही दारूण असा पराभव मोहिते-पाटील यांचा म्हणावा लागेल. राजाभाऊ राऊत यांनी जिल्ह्यात तयार केलेली मजबुत फळी, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पैकीच्या पैकी जागा मिळवत दाखवून दिलेले आपले राजकीय कौशल्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्यावर असलेली खास मर्जी त्यांना सातत्याने बळ देत गेली. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा झालेला निसटता पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि अगदी सामान्य बार्शीकरांच्याही जिव्हारी लागलेला होता. विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांना एक संधी हवी होती. आणि ती या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना मिळाली. त्यांनी मतदारांशी तालुक्या तालुक्यात जावून संपर्क केला, नेत्यांच्या भेटी घेतल्या, इतकेच नाहीतर विरोधकांनाही ते जाऊन भेटले. त्यांच्यातील आक्रमक पण तरीही संयमी आणि संतुलीत नेता सगळ्यांनाच भावला. आज जिल्हा परिषदेवर त्यांचे वर्चस्व आहे, बार्शीत मार्केट कमिटीपासून नगरपालिकेपर्यंत त्यांचेच वर्चस्व आहे. जिल्ह्यातील एक उमदे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. असे असतानाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट त्यांनाच आव्हान देत अदृष्य शक्तीचा मुद्दा उपस्थित करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने राऊत विरूध्द मोहिते-पाटील या नव्या संघर्षाची सुरूवात झाली आहे. हा राजकीय संघर्ष मोहिते-पाटील यांना भविष्यात जड जाणार हे निश्चित. त्याचे कारण असे की नुकतीच राजाभाऊ राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया. निवडणुकीचा निकाल लागू द्या, मग अकलूजच्या विजय चौकात जाहीर सभा घेतो आणि मोहिते-पाटलांनी केलेल्या आरोपांना उत्तर देतो, असे ते म्हणाले, इतक्यावरच ते थांबले नाहीत तर डीसीसी बँक आणि अकलूजच्या सुुिमत्रा पतसंस्थेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यांचा थेट इशारा असाच होता की आता मोहिते-पाटील यांच्या विरोधात आपण लढा देऊ. कधीकाळी सोलापूर जिल्ह्याचे राजकीय केंद्रस्थान हे अकलूज होते. जिल्ह्याच्या राजकारणाचे पानही मोहिते-पाटील यांच्याशिवाय हालत नव्हते. पण त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील हे राजकारणात सक्रिय होते. त्यांनी संयमी आणि संतुलित राजकारण केली. उगीच विरोधासाठी विरोध करण्याची दादांची भूमिका कधीच राहिली नाही. त्या उलट आता ते सक्रिय नसल्याने राजकीय विरोध वाढत गेला आणि मोहिते-पाटील यांची सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड हळूहळू कमी होत गेली. रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपात आहेत की नाही, हेही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राजाभाऊ राऊत Rajabhau Raut बाजीगर ठरले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता बार्शीकडे Barshi सरकला आहे. अनेक घडामोडी आगामी काळात पाहण्यास मिळणार आहेत. पण आता इतके नक्की आहे की मोहिते-पाटील यांच्या राजकीय अस्तीत्वाला राजाभाऊ राऊत मोठा शह देणार असेच सध्या तरी दिसत आहे. आता विधानपरिषदेच्या निमित्ताने राजाभाऊ राऊत हे जिल्ह्याचे आमदार झाले आहेत. त्याचा उपयोग ते विकासाच्या अनुषंगाने जसा करतील, तसाच तो आपली जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड अधिक मजबूत करण्यासाठीही करतील. bjp भाजपकडे जिल्ह्याच्या राजकारणात आज तरी त्यांच्या इतका सक्षम नेता नाही.









