#पुणे : पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा परिसरातील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्त्व विभागाने घातलेली बंदी अखेर शासनाने मागे घेतली आहे. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान आणि रणरागिणी शाखा यांच्या संयुक्त पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी समाधान व्यक्त करत याला धार्मिक स्वातंत्र्याचा विजय म्हटले आहे.
संघटनांच्या शिष्टमंडळाने पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयाकडे निवेदने देत वटपूजनावरील प्रस्तावित बंदी तातडीने मागे घेण्याची मागणी केली होती. हा निर्णय हिंदू महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप संघटनांनी केला होता. Mahatma Phule Wada
या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहने यांनी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवून महात्मा फुले वाडा हे राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्यापूर्वीपासून सुरू असलेल्या परंपरा व चालीरीती कायम ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यास सांगितले.
या निर्णयाचे स्वागत करत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितले की, वटसावित्री व्रताचे पारंपरिक पूजन रोखण्याचा पुरातत्त्व विभागाचा आदेश हा अन्यायकारक होता. समितीच्या आंदोलनानंतर आणि अधिवक्त्यांनी दिलेल्या कायदेशीर नोटिशीनंतर प्रशासनाने तो आदेश मागे घेतला. त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन करत, हिंदूंना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली.
दरम्यान, समितीने सर्व हिंदू महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी महात्मा फुले वाडा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाचे पूजन करण्याचे आवाहन केले आहे.









