Tuesday, July 28, 2026
Home ताज्या बातम्या NEET 2026 Result: मुलींची बाजी, महाराष्ट्राची दमदार कामगिरी; टॉपर्स यादी

NEET 2026 Result: मुलींची बाजी, महाराष्ट्राची दमदार कामगिरी; टॉपर्स यादी

0
9
NEET UG 2026 Result Maharashtra Toppers Marathi News
NEET UG 2026 निकालात महाराष्ट्राचे विद्यार्थी देशभरात चमकले; मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली.

 

नीट 2026 मध्ये पुन्हा मुलींची सरशी; महाराष्ट्राची देशभरात दमदार छाप

देशात दोन विद्यार्थ्यांना 715 गुण; महाराष्ट्राचे दोन विद्यार्थी ऑल इंडिया टॉप-17 मध्ये, श्रावणी कुडाळे देशातील अव्वल ओबीसी विद्यार्थिनी

नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)ने जाहीर केलेल्या नीट-यूजी 2026 च्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून पात्र विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे प्रमाण 58 टक्क्यांहून अधिक आहे. देशभरातील सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 11.21 लाख विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदाचा पात्रतेचा दर सुमारे 56 टक्के राहिला आहे. देशभरातील 551 शहरांतील 5,440 परीक्षा केंद्रांवर तसेच परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.

निकालाच्या विश्लेषणानुसार मुलींचा पात्रतेचा दर 56.8 टक्के असून मुलांचा 55.1 टक्के आहे. त्यामुळे सलग आणखी एका वर्षी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मुलींनी आघाडी कायम राखली आहे. प्रवर्गनिहाय पाहता ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) प्रवर्गातील सर्वाधिक 5.08 लाख विद्यार्थी पात्र ठरले. त्यानंतर जनरल प्रवर्गातील 2.91 लाख, अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील 1.59 लाख, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील 95 हजारांहून अधिक, अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील 63,716 तर दिव्यांग प्रवर्गातील 300 हून अधिक विद्यार्थी पात्र झाले आहेत.

यंदाच्या परीक्षेत कमाल 720 पैकी 715 गुण मिळवणारे केवळ दोन विद्यार्थी देशात आहेत. पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पंचुल बंचल यांनी ही कामगिरी करत संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे. 700 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे केवळ 19 विद्यार्थी असून 690 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या 138 आहे. 650 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 1,492, 600 पेक्षा अधिक गुण मिळवणारे 10,160 तर 500 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 90,780 इतकी आहे. यावरून यंदाच्या परीक्षेतील स्पर्धेची तीव्रता स्पष्ट होते.

यंदाच्या निकालात महाराष्ट्रानेही देशभरात आपला ठसा उमटवला आहे. ऑल इंडिया टॉप-17 मध्ये महाराष्ट्राचे दोन विद्यार्थी स्थान मिळवण्यात यशस्वी झाले. श्रावणी कृष्णा कुडाळे हिने ऑल इंडिया रँक 5 मिळवत ओबीसी प्रवर्गात देशात प्रथम क्रमांक पटकावला. तिचा पर्सेंटाईल 99.9965 इतका आहे. महेश पाटील सार्थक याने ऑल इंडिया रँक 14 मिळवत जनरल प्रवर्गात महाराष्ट्राचा झेंडा उंचावला.

एससी प्रवर्गात महाराष्ट्राची विशेष चमक पाहायला मिळाली. संध्या क्षितीज डोंगरे हिने ऑल इंडिया रँक 28 मिळवत एससी प्रवर्गात देशात प्रथम क्रमांक मिळवला, तर प्रणव टेंभुर्णे याने ऑल इंडिया रँक 33 मिळवत देशात दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे एससी प्रवर्गातील पहिले दोन राष्ट्रीय मानांकित विद्यार्थी महाराष्ट्रातील असल्याची उल्लेखनीय कामगिरी यंदा घडली आहे. सौम्य बडोले (रँक 77) हिनेही उत्कृष्ट यश मिळवले.

जनरल प्रवर्गात निशिकांत पाटील सोहम (रँक 53), सागर राजेश कारीकर (रँक 67), आर्या अभिजीत दिवेकर (रँक 90), अर्णव लाहोटी, रश्मिक गुप्ता यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्तायादीत स्थान मिळवले. ओबीसी प्रवर्गात साहीम सादिक पटवेगर (रँक 106) आणि सोहान सलीम शेख (रँक 116) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ईडब्ल्यूएस प्रवर्गात समीर जाधव (रँक 177) आणि अनिकेत मानकर (रँक 211) यांची नावे गुणवंतांमध्ये आहेत. एसटी प्रवर्गात सुरेश चव्हाण याने ऑल इंडिया रँक 650 मिळवली. दिव्यांग प्रवर्गात रुचा प्रसाद जोशी, मोहम्मद कलीम आणि कमलेश नायर यांनीही राष्ट्रीय गुणवत्तायादीत स्थान मिळवले.

राज्यनिहाय विश्लेषणात राजस्थानने सर्वाधिक टॉप रँकर्स देत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तेलंगणाने सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केली असून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार आणि कर्नाटक या राज्यांतील विद्यार्थ्यांनीही राष्ट्रीय गुणवत्तायादीत मोठ्या प्रमाणात स्थान मिळवले आहे.

गेल्या काही महिन्यांत नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा काही प्रमाणात मलिन करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अंतिम निकालात राज्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः मुलींचे राष्ट्रीय पातळीवरील वर्चस्व, एससी प्रवर्गातील अव्वल दोन स्थानांवर महाराष्ट्राचे विद्यार्थी आणि टॉप-17 मध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड यामुळे यंदाची नीट-2026 परीक्षा महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here