मुंबई : आपल्या धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध प्रशासनात नियुक्ती होताच औषध दुकानांच्या चालकांनीही चांगलीच धास्ती घेतली आहे. आता औषध निरीक्षकच सर्व नियमांचे पालन करण्याची सक्ती या दुकान चालकांना करीत आहेत. त्यामध्ये डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) आणि फार्मासिस्ट उपस्थित असणे यावर भर देण्यात आला आहे.औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत, राज्यातील औषध दुकानांवर नियंत्रण ठेवले जाते. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून वैध, स्वाक्षरी केलेले प्रिस्क्रिप्शन मिळाल्यानंतरच ठराविक औषधे हे दुकान चालक देऊ शकतात. परंतु बऱ्याचवेळा त्यात हयगय केली जाते. प्रामुख्याने कफ सिरप वा विशिष्ट प्रतिजैवके, शामक औषधांचा समावेश आहे. याशिवाय काही औषधे ही रेफ्रिजेटरमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. बऱ्याचवेळा या औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट नावापुरता असतो. आता मात्र याबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच औषध निरीक्षकांनी घेतला आहे. आयुक्त कधी कुठे छापा टाकतील याचा नेम नाही, असे ते सांगत आहेत तर काही औषध निरीक्षक बिनधास्त आहेत. अनुसूची एच आणि एच वन यामध्ये प्रतिजैविके, शामक औषधे आणि अधिक प्रभावी औषधांचा समावेश होतो. औषधविक्रेत्यांनी अनुसूची एच वनमधील औषधांची प्रत्यक्ष पडताळणी करणे आणि काटेकोर नोंद ठेवणे बंधनकारक आहे. मानसिक आजारावरील औषधांचा त्यात समावेश होतो. अनुसूची एक्समध्ये अत्यंत नियंत्रित पदार्थ आणि मादक द्रव्यांचा समावेश होतो. औषधविक्रेत्यांनी औषधचिठ्ठीची छापील प्रत दोन वर्षांसाठी दप्तरी जतन करून ठेवली पाहिजे, असेही बंधनकारक आहे.

Tukaram Mundhe , FDA , MUMBAI (AI GEN IMAGE )
वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिबंधित औषधांचा विक्री हा गंभीर गुन्हा मानला जातो. शिक्षेमध्ये मोठ्या रकमेच्या दंडापासून ते औषध परवाना रद्द होणे वा तुरुंगवास होऊ शकतो. किमान एक ते तीन वर्षांपर्यंत वा औषध मादक किंवा मनोविकारी पदार्थ असेल तर तुरुंगवास आणखी वाढू शकतो. याशिवाय किमान दंड पाच हजार रुपयांपासून सुरु होतो. औषध दुकानाचा परवाना तात्पुरता निलंबित किंवा कायमचा रद्द करू शकतात. याशिवाय नोंदणीकृत फार्मासिस्ट औषध दुकानात प्रत्यक्ष उपस्थित नसल्यास औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यान्वये तुरुंगवास (३-६ महिन्यांपर्यंत) किंवा दंड (दोन लाखांपर्यंत) तसेच परवाना रद्द करणे आणि दुकान तात्काळ सील करणे आदी तरतुदींचा समावेश आहे.







