Tuesday, July 28, 2026
Home ताज्या बातम्या दूध भेसळ प्रकरण : बदनामीचा प्रयत्न निराधार; आमदार सुरेश धस यांनीच सर्वाधिक...

दूध भेसळ प्रकरण : बदनामीचा प्रयत्न निराधार; आमदार सुरेश धस यांनीच सर्वाधिक आवाज उठवला – प्राजक्ता धस

0
8
दूध भेसळ प्रकरणात बदनामीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना प्राजक्ता धस.
दूध भेसळ प्रकरणात बदनामीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना प्राजक्ता धस.

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे राजकारण; ‘पुरावे असतील तर जाहीर करा, अन्यथा अफवा थांबवा’ – प्राजक्ता धस

आष्टी | प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांतून नाव न घेता आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य दूध सहकारी महासंघ (महानंद)च्या संचालिका प्राजक्ता धस यांनी केला आहे. कोणतेही ठोस पुरावे नसताना सूचक पद्धतीने संशय निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असून हा प्रकार दिशाभूल करणारा आणि हेतुपुरस्सर बदनामी करण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्राजक्ता धस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, ज्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे असतील त्यांनी ते समाजमाध्यमांवर अफवा पसरवण्याऐवजी सार्वजनिक करावेत आणि संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत. अन्यथा बदनामी करणाऱ्या बातम्या तातडीने मागे घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

दोषींवर कठोर कारवाई व्हावी

त्यांनी सांगितले की, आमदार सुरेश धस यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात दूध भेसळीविरोधात सर्वाधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेत, विविध बैठका तसेच दुग्धविकास मंत्र्यांसोबतच्या चर्चांमध्ये त्यांनी सातत्याने दूध भेसळीचा मुद्दा उपस्थित केला. दूध भेसळ हा ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर गुन्हा असल्याने दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद व्हावी आणि कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी सातत्याने केली असल्याचा दावा प्राजक्ता धस यांनी केला.

त्यांच्या मते, आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच राज्यात दूध भेसळ करणाऱ्यांविरोधातील कारवाईला गती मिळाली. मात्र, या कारवाईची धार कमी करण्यासाठी आणि जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून हटवण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून नियोजनबद्ध पद्धतीने अफवा पसरवल्या जात आहेत.

प्राजक्ता धस यांनी आरोप केला की, काही राजकीय नेत्यांकडून आणि समाजमाध्यमांमधून “बीडमधील आमदाराची पत्नी” किंवा “बड्या नेत्याची पत्नी” अशा शब्दांत बातम्या प्रसिद्ध करून प्रत्यक्ष नाव न घेता संशयाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित पत्रकारांकडे विचारणा केली असता बातमीत आपले नाव नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, नाव न घेता एखाद्या व्यक्तीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न हा पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून नसल्याचे त्यांनी नमूद केले.

दूध भेसळीविरोधात सातत्याने आवाज उठवल्यामुळेच आपल्याविरोधात अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा दावा त्यांनी केला. तसेच स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतरही आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगत, समाजहिताचे प्रश्न मांडणाऱ्यांना खोट्या प्रकरणांत अडकवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा अनुभव आम्हाला आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील एका दूध डेअरीबाबत संशयास्पद माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे संदेश पाठवून चौकशीची मागणी केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नसून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या पंधरा वर्षांपासून मंचर येथील दूध संघ व दूध पावडर प्रकल्पाशी आपला कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी आष्टी तालुक्यात समोर आलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणाचे धागेदोरे मंचर-आंबेगाव परिसरातील काही दूध संघांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आजही त्या भागातील दूध व्यवहारांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला.

अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात

याशिवाय, आष्टी दूध संघाने गुणवत्तेअभावी नाकारलेले दूध काही अन्य डेअऱ्यांकडून स्वीकारले जात असल्याच्या तक्रारी पूर्वीपासून आहेत. संबंधित डेअरीकडून बल्क मिल्क कूलर (BMC) चालक तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक महिन्यांपासून देयके दिली जात नसल्याच्या तक्रारीही सातत्याने येत असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण व्यवहाराची निष्पक्ष चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला.

शेवटी प्राजक्ता धस यांनी आवाहन केले की, दूध भेसळ हा जनतेच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असून त्यावर राजकारण होऊ नये. कोणताही दोषी मोठा असो किंवा लहान, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, खोटे आरोप आणि अफवांद्वारे दूध भेसळीविरोधात आवाज उठवणाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जनतेने ओळखावा.

ज्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे असतील त्यांनी ते समाजमाध्यमांवर अपप्रचार करण्याऐवजी सार्वजनिक करावेत आणि संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत.
“दूध भेसळ हा जनतेच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय आहे. या विषयावर राजकारण न करता कोणताही दोषी मोठा असो किंवा लहान, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र खोटे आरोप करून दूध भेसळीविरोधात लढणाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जनतेने ओळखावा,” असे आवाहन प्राजक्ता धस यांनी शेवटी केले.

read this ; आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलिसांची धडक मोहीम; 53 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here